धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका अडीच वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक छेडछाड केल्याच्या संशयावरून एका 80 वर्षीय वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार 112 या हेल्पलाइन क्रमांकावर प्राप्त झाली होती.
माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयिताला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे.
