कॉलेज तरुणीला ताप आला, रुग्णालयात नेलं अन् अचानक…; पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर,

अलीकडे अगदी कमी वयातही कोणता किरकोळ आजाराने कोणाच्या जीवावर बेतेल, याचा भरोसा नाही. अगदी कमी वयातही किरकोळ आजार जीवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे घडली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अवघ्या 20 वर्षीय युवतीचा अगदीच किरकोळ आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली आहे. श्रावणी मनोज पवार असं या युवतीचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राजापूर येथे घडली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, राजापूर शहरात दिवटेवाडी येथे राहणारी श्रावणी मनोज पवार हिला गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. घरच्यांनी तातडीने तिला दवाखान्यात दाखल केले होत. त्यानंतर तिला थोडं बरं वाटल्यानंतर श्रावणी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजलाही गेली होती होती. मात्र कॉलेजमधून घरी आल्यावर तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी तिला पुन्हा राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केलं.

श्रावणीला पुन्हा ताप भरला होता. तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं. अशातच राजापूर ग्रामीण रुग्णालयात श्रावणीचा काही वेळातच मृत्यू झाला. श्रावणीच्या मृत्यूची माहिती कळताच ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. 20 वर्षीय मुलीने अचानक प्राण सोडल्याने नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. कुटुंबातील सदस्यांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर सुन्न झाला होता.

दरम्यान, श्रावणीच्या मृत्यूमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. श्रावणीच्या पश्चात आई वडील भावंड असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राजापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *