छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार! 27 लाखांची जबरी चोरी, आरोपीला पाहून मालकाच्या पायाखालची जमीन सरकली

छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याची 27 लाख रुपयांची बॅग हिसकावल्याची घटना घडली होती. या जबरी चोरीच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. यात बाप-लेकानेच ही चोरी घडवून आणल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगरात डोळ्यात मिरची पूड फेकून कटरने वार करीत भरदिवसा 27 लाख रुपयांची बॅग हिसकावल्याची घटना उस्मानपुऱ्यात घडली होती. मात्र, हा सर्व बनाव असल्याचे पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उघड केले आहे. ज्याच्या हातातून बॅग हिसकावली तो चालकच यातील मास्टरमाइंड निघाला.

कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने मुलाला हाताशी धरून मालकाचीच रक्कम लुटण्याचा डाव आखला. या प्रकरणी दोघा बाप-लेकांना अटक करण्यात आली असून 25 लाख 2 हजार 480 रुपये जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षे एका कंपनीत चालक म्हणून नोकरी केल्यावर आता नोकरी सोडायची असल्याने अखेरचा हात मारण्याचा त्याने प्रयत्न केला, अशी माहिती उघड झाली आहे. मात्र पोलिसांनी अवघ्या 12 तासांत त्याचे पितळ उघडे पाडले. गणेश ओंकारराव शिंदे आणि त्यांचा मुलगा अमोल गणेश शिंदे अशी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कट कसा रचला?

गणेश शिंदे हा पैसे कारमध्ये नेऊन ठेवत असताना दोन अज्ञातांनी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर त्याच्यावर कटरने वार करत डोळ्यात तिखट टाकून 27 लाख रुपयांची बॅग घेऊन पसार झाले.  या घटनेनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करताना पोलिसांना काही बाबी खटकल्यानंतर त्यांना गणेश शिंदे यांचा जबाब घेतला. मात्र त्याच्या जबाबात विसंगती आढळून आल्यानंतर पोलिसांचा संशय आणखीन बळावला. पोलिसांनी गणेशची चौकशी केली असता मुलगा अमोल याने हा कट रचल्याची कबुली त्याने दिली आहे.

गणेश शिंदे हा कर्जात होता. तसंच, आईदेखील आजारी होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने क्राइम पेट्रोल पाहून हा कट रचल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 25 लाख 2 हजार 480 रुपये जप्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *