सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अंतिम निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. मृत डॉक्टरबाबत कोणतेही विधान करताना संवेदनशीलता, संयम बाळगावा, असे आवाहन करताना ‘ मार्ड ’ने पुढील काही दिवस आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
पीडित डॉक्टरला न्याय मिळावा, यासाठी विविध प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. आज, गुरुवारी रुग्णालयांमध्ये जनजागृती बॅनर लावण्यात येतील. तसेच डॉक्टर तोंडावर काळ्या टेप लावून प्रतीकात्मक निदर्शने करण्यात येणार आहेत. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी ३१ ऑक्टोबरला डिजिटल आर्ट आणि रांगोळीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच १ आणि २ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर ‘#justicefordoctors’ आणि ‘ #justiceforPhalatanMO ‘ या हॅशटॅगसह आपल्या मागण्यांसाठी मोहीम राबवण्यात येईल. तसेच २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गेटवे ऑफ इंडिया आणि सीएसएमटी येथे मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात डॉक्टर तसेच सर्वसामान्य सहभागी होणार आहेत. ३ नोव्हेंबर रोजी आपत्कालीन सेवा सुरू राहतील, तर इतर बिगरआपत्कालीन सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत.
चौकशीसाठी सहकार्य करणारे सर्व डॉक्टर, कर्मचारी किंवा इतर व्यक्तींना कायदेशीर व संस्थात्मक संरक्षण देण्यात यावे, चौकशी व न्यायालयीन प्रक्रियेतील प्रगती नियमितपणे जाहीर करावी. तसेच डॉक्टरांच्या कार्यस्थिती, मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेचा नियमित आढावा घेण्यात यावा, अशी मागणी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.
