23 स्थानकं, 23.3 किमी लांब मार्ग कसा असेल? माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा विस्तार, राज्य सरकारचे आदेश

पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे. मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात महामेट्रो हा विस्तार करणार आहे. राज्य सरकारने या विस्ताराबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या या मेट्रो प्रकल्पाचं सुरू असलेलं काम पूर्ण करण्याएवढीच ‘पीएमआरडीए’ची जबाबदारी राहणार आहे.

मेट्रो मार्गिकेचा विस्तार

राज्य सरकारने उर्वरित महाराष्ट्रातील मेट्रोचा विस्तार करण्याची जबाबदारी ही महामेट्रोकडे दिली आहे, तर मुंबईतील विस्ताराची जबाबदारी ‘एमएमआरडीए’कडे देण्यात आली आहे. त्यामुळे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचा विस्तार महामेट्रोकडून केला जाईल, अशी माहिती पीएमआरडीए, महानगर आयुक्त, डॉ. योगेश म्हसे यांनी दिली आहे.

23.3 किमी लांबीचा मार्ग, 23 स्थानकं

‘पीएमआरडीए’कडून मेट्रो प्रकल्प टाटा-सिमेन्स कंपनीसोबत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) राबवण्यात येत आहे. या 23.3 किलोमीटर लांबीच्या मार्गात 23 स्थानकं आहेत. मेट्रोची एकूण प्रवासी संख्या, मेट्रोची क्षमता सुमारे 1 हजार असणार आहे. सध्या या प्रकल्पाचं जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालं असून, इतर काम शेवटच्या, अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षीच्या पहिल्या त्रिमाहीमध्ये ही मेट्रो धावणार असल्याचा अंदाज आहे.

माण-हिंजवडीपासून शिवाजीनगर या एकाच टप्प्यात मेट्रो

चालू वर्षी जुलै महिन्यात या मेट्रोची माण डेपो ते पीएमआर-चार स्थानकापर्यंत पहिली चाचणी घेण्यात आली. या मेट्रोचे काम पूर्ण होऊन ती धावण्यास मार्च 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही मेट्रो ‘पीपीपी’ तत्त्वावरील असल्याने एकाच टप्प्यात माण-हिंजवडीपासून शिवाजीनगर या अखेरच्या स्थानकापर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

मेट्रो विस्तारीकरणाची जबाबदारी महामेट्रोची

या मेट्रो मार्गिका तीनचं विस्तारीकरण करणं आवश्यक होतं. त्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, मेट्रो विस्तारीकरणाची जबाबदारी राज्य सरकारने महामेट्रोकडे दिली आहे. त्यामुळे विद्यमान प्रकल्प पूर्ण केल्यानंतर ‘पीएमआरडीए’ची जबाबदारी संपणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *