दिवाळीसाठी तरुण घरी आला, पण आनंदाचा क्षण दु:खात बदलला; गावात पोहोचताच… कुटुंबाचा टाहो

एकीकडे दिवाळीचा उत्साह, दारात रांगोळ्यांचे रंग, आकाशात फटाक्यांची आतषबाजी असं आनंदाचं वातावरण असताना धुळ्यातील एका गावावर शोककळा पसरली आहे. वेल्हाणे गावातील तरुण विकास श्रावण महाले (25), याची 7 ते 8 जणांच्या जमावाकडून निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेने गावात खळबळ उडाली असून तरुणाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दिवाळीत आपल्या घरी आनंद साजरा करण्यासाठी आलेल्या या तरुणाचा जमावाने खून केल्याने गावासह संपूर्ण तालुका हादरला आहे.

यात्रेतील जुना वाद पेटला आणि…

धुळे तालुक्यातील शिरुड वेल्हाणे गावात रक्षाबंधनाचं औचित्यसाधून चांगदेव देवाची यात्रा भरवली जाते. या यात्रेत पंचक्रोषीतून भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात. दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी चांगदेव देवाच्या यात्रेत भाविक सहभागी झाले होते. गाव शिवारात आनंदाचं वातावरण असताना विकास महाले आणि काही तरुणांमध्ये वाद झाला होता. भांडण विकोपाला जात असताना मध्यस्थी करुन वाद मिटवण्यात आला होता.

धुळे तालुक्यातील शिरुड वेल्हाणे येथील विकास महाले हा तरुण नाशिक येथे रिक्षाचालक आहे. नाशिक येथून गावातील चांगदेव देवाच्या यात्रेनिमित्त तो आलेला होता. यात्रा आटोपल्यानंतर आणि भांडण मिटल्यामुळे तो नाशिकला रवाना झाला होता. आता दिवाळीनिमित्त तो गावात पुन्हा आलेला होता. सामोपचाराने जुना वाद मिटला असल्याने विकास निवांत होता. पण समोरच्याने वाद मिटवला नव्हता. दिवाळीत सायंकाळी उशिरा गावात फिरत असताना त्याला काही जमावाकडून एकटं पकडण्यात आलं आणि त्याच्यावर जमावाने हल्ला केला. हा हल्ला प्राणघातक ठरला.

पोलिसांकडून संशयितांची धरपकड

तरुणाचा खून झाल्याची माहिती समजताच धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि तालुका पोलिसांचं पथक तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथकही घटनास्थळी दाखल झालं. धुळे तालुका पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, घटनेनंतर फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *