अंबरनाथ येथील एका ६६ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारासाठी पुढील रुग्णालयात हलवण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्याने ती वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याचा आरोप करण्यात येत आहे. रुग्णालयाने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काय आहे प्रकरण?
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ शहरातील स्वामी नगर येथील ६६ वर्षीय मीना सूर्यवंशी यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना गंभीर अवस्थेत छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना ठाणे किंवा मुंबई येथील रुग्णालयात हलवण्याची गरज असल्याचे सांगितले.
अंबरनाथ पश्चिम भागातील सर्कस मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे लोकार्पण रविवारी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे, उषा नाडकर्णी, अलका कुबल, मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, विजय गोखले, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर, अशोक पत्की, अशोक समेळ, मंगेश देसाई यासारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते.
