मुंबईतील वाहतूक कोंडीमुळं नागरिकांना दररोजच त्रास सहन करावा लागतो. कित्येक तास नागरिक त्या वाहतुक कोंडीत अडकून पडतात. दोन-दोन तास झाले तरी नागरिक एकाच ठिकाणी अडकून पडतात. 15 मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल दीड किंवा दोन तास लागतात. मुंबईच्या या वाहतूक कोंडीवर प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबईत 70 किमी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार केला आहे. त्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण मुंबईची थेट बुलेट ट्रेन स्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ, बोरीवली यांना जोडणी देण्यासाठी, तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्यादरम्यानची वाहतूक जलद करण्यासाठी तब्बल 70 किमी लांबीचे भुयारी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. भुयारी मार्ग उभारण्याच्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी एमएमआरडीए सल्लागार नेमणार आहे.
भुयारी मार्गाचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात कोस्टल रोडची थेट बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाला जोडणी देण्यात येणार आहे. वांद्रे वरळी सी लिंक संपतो तिथून पुढे बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्ग उभारला जाईल. हा मार्ग पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे.भुयारी मार्गाची जोडणी पूर्व उपनगरात चेंबूर आणि एमटीएचएलजवळ दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारला जाईल.तिसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबई थेट भुयारी मार्गानी बोरीवलीपर्यंत जोडली जाईल.
पहिला टप्पा – वांद्रे-वरळी सी-लिंक ते बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक ते आंतरराष्ट्रीय विमानतळ – 16 किमी लांबी
दुसरा टप्पा – पश्चिम द्रुतगती महामार्ग ते पूर्व द्रुतगती महामार्गाची जोडणी. यात आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हा मार्ग जाईल – 10 किमी
तिसरा टप्पा – थेट दक्षिण मुंबई ते बोरीवली भुयारी मार्ग उभारला जाईल. हा भुयारी मार्ग ठाणे बोरीवली टनेलला जोडला जाईल – – 44 किमी
एमएमआरडीएकडून या भुयारी मार्गाची कामे सुरू
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग – लांबी 11.85 किमी – प्रकल्प खर्च 18,838 कोटी
ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग -लांबी 9.23 किमी – प्रकल्प खर्च 9,158 कोटी रुपये.
मुंबई महापालिका
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता भुयारी मार्ग -12.20 किमी लांबी
