एकमेकांसमवेत आयुष्य जगण्याच्या आणाभाका घेऊन लग्न केलेल्या उच्चशिक्षित जोडप्याचा संसार अवघ्या २८ दिवसांत मतभेदांमुळे तुटला. परस्परविरोधी स्वभाव आणि राहणीमानातील तफावत या कारणांमुळे एकमेकांशी पटत नसल्याने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वर्षभर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यावर कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याच्या परस्पर संमतीने घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केले.
राकेश आणि पल्लवी (नावे बदलली आहेत) यांचा विवाह सात जुलै २०२४ रोजी झाला होता. पुण्यात राहणारे दोघेही उच्चशिक्षित असून, आयटी क्षेत्रात खासगी कंपनीत नोकरी करतात. स्वभाव भिन्नतेमुळे लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले. दोन्ही कुटुंबीयांनी जोडप्याची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पती-पत्नीमधील वाद वाढत गेले.
