शनी शिंगणापूर देवस्थानात जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयाला सील, भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर मोठा दणका

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानात भ्रष्टाचाराचे ढग आणखीनच गडद झाले आहेत. देवस्थान विश्वस्त मंडळावर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, असे विविध गंभीर आरोप झालेले असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे. शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय सील ठोकण्यात आले.

कागदपत्रांची हेराफेरी, खात्रीशीर माहितीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धडक

विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतरही प्रशासकीय कार्यालयातून कागदपत्रांची हेराफेरी सुरू असल्याच्या खात्रीशीर माहितीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे नष्ट केले जावू नयेत, म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ग्रामस्थांच्या साक्षीनेच जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

या कारवाईदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सर्वात मोठं प्रश्नचिन्ह म्हणजे कारवाईच्या वेळी कार्यकारी अधिकारी कार्यालयात हजर नव्हते. त्यांच्या गैरहजेरीमुळे प्रशासनावरील संशयाचे सावट अधिकच गडद झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या कारवाईसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या साक्षीनेच कार्यालयाला सील करण्यात आले.

बरखास्तीनंतरही कागदपत्रांवर संशय, देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय सील

देवस्थान विश्वस्त मंडळावर गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहाराचे आरोप होत होते. देणग्यांमधील अपहार, खर्चातील अनियमितता, कामकाजातील ढिसाळपणा अशा विविध मुद्द्यांवरून विश्वस्त मंडळाविरोधात असंतोष वाढला होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकीय नियंत्रण हाती घेतले. मात्र, बरखास्तीनंतरही देवस्थानातील कागदपत्रांवर शंका निर्माण झाल्याने प्रशासनाला थेट सील करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *