आधी पावसाचा मारा, आता भूकंपाचा हादरा; लातूरमध्ये भीतीचं वातावरण!

थैमान घालणाऱ्या पावसामुळं मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं असून, बळीराजाला भविष्य अंधकारमय दिसू लागलं आहे. लातूरला याचा सर्वाधिक फटका बसला असून पावसामुळं इथं आलेल्या पूरस्थितीनं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे, स्थानिकांच्या डोळ्यंतील अश्रू थांबता थांबत नाहीयेत. त्यातच या लातूरला आणखी एका संकटाचा सामना करावा लागला तो म्हणजे भूकंपाचा.

लातूरमध्ये भूकंपाचे धक्के… 

लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचं वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली असून, यामुळं पावसाच्या संकटातून सावरण्याची वेळ हाताशी मिळत नाही तोच भूकंपाचे हादरे जाणवल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.

सुदैवानं या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालं नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळं प्रशासनानंही नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान लातूरमध्ये आलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या मुरूड अकोला परिसरात होता. या भूकंपाची खोली भूपृष्ठापासून 5 किमीपर्यंत मोजण्यात आली, तर त्याची तीव्रता अतिशय सौम्य होती. मात्र संकटामागून संकटं येत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *