साईबाबांच्या शिर्डीला जाताना अनेकवेळा साईभक्त मुक्कामासाठी भक्तनिवासाला प्राधान्य देतात. ऑनलाईन बुकिंगसाठी भक्तनिवासाच्या वेबसाईटचाही वापर केला जातो. पण आता सायबर भामट्यांनी साईसंस्थानच्या भक्तनिवासाची हुबेहुब वेबसाईट बनवली आहे. या वेबसाईटच्या नावाखाली अनेक साईभक्तांची फसवणूक होऊ लागली आहे.

शिर्डीच्या साईसंस्थानच्या भक्तनिवासाबाहेर हताशपणे उभे असलेले हे कर्नाटकातील गुलबर्गाचे साईभक्त रामू जाधव पाहा. रामू जाधव हे त्यांच्या नातू आणि सुनेसह कर्नाटकातून शिर्डीत साईदर्शनासाठी आलेत. पण साईंच्या दरबारी आल्याच्या आधीच रामू जाधव यांची फसणूक झाली आहे.

रामू जाधव यांनी शिर्डीला येण्याआधीच साईबाबा संस्थानच्या भक्तनिवासाची वेबसाईट गुगलवर सर्च केली. वेबसाईटवरुन बुकिंगसाठी व्हॉट्सअॅपवर स्कॅनर देण्यात आला. स्कॅनरवरुन त्यांनी 2100 रुपये देऊन टाकले. वेबसाईटनं त्यांना भक्तनिवासात खोली दिल्याचं सांगितलं.

जेव्हा रामू जाधव प्रत्यक्ष शिर्डीत आले तेव्हा त्यांनी भक्तनिवासात खोलीची मागणी केली. खोलीची मागणी केल्यावर भक्तनिवासात त्यांच्या नावाची कोणतीही बुकिंग नसल्याची माहिती समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे त्या वेबसाईटवर साईसंस्थानच्या भक्तनिवासाचा फोटो लावण्यात आला आहे.

संबंधित बेवसाईटवर फोन केला असता त्या फोनवरुन आणखी 900 रुपयांची मागणी करण्यात आली. शिवाय खोलीच्या बुकिंगबाबत दिशाभूल करणारी उत्तरं देण्यात आली.

साई दर्शनाच्या नावाखालीही यापूर्वी अशाच ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. भक्तनिवासातील ऑनलाईन बुकिंगच्या निमित्तानं त्याची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे यापुढं कोणत्याही भक्तनिवासाची किंवा देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन किंवा ऑनलाईन देणगी देताना शंभरवेळा त्याची पडताळणी करा. अन्यथा तुमचीही रामू जाधव या साईभक्तांसारखी फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *