अनेकदा झेडपीच्या शाळा असा उल्लेख जरी निघाला तरीही सध्या नोकरीवर असणारी मंडळी त्यांच्या शालेय दिवसांमध्ये रममाण होतात आणि अनेकांचेच असंख्य किस्से आणि शालेय जीवनात केलेली धमाल सांगू लागतात. झेडपीची शाळा म्हणजे जणू एक भावनाच आहे, ती शब्दांत मांडता येणार नाही, असं मानणारा एक वर्ग असला तरीही बऱ्याच शहरी मंडळींना मात्र झेडपी शाळांचं फारसं कौतुक नाही ही वस्तूस्थितीसुद्धा नाकारता येत नाही.

हाच दृष्टीकोन बदलत समाजात एक नवा पायंडा घातला आहे तो म्हणजे नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी. सध्या राज्यभरात त्यांच्या एका निर्णयाची चर्चा होत असून हा निर्णय कौतुकाची थापही मिळवून जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची मुलं झेडपी अंगणवाडीत… 

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी स्वतःच्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घेऊन दिला आगे. नंदुरबारच्या मुख्य शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव अंगणवाडीत त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना शालेय जीवनाची पूर्वकल्पना देणाऱ्या आणि शिस्तीचे महत्त्वाचे निकष बालवयातच पटवून सांगणाऱ्या या अंगणवाडीत पाठवयला सुरुवात केली आहे.

कितीही नाकारलं तरीही सर्वसाधारणपणे गरीब घरातली मुले अंगणवाडीत प्रवेश घेतात, हा अनेकांचाच समज. पण नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी मात्र हा समज मोडीत काढून स्वतः च्या जुळ्या मुलांना ZP च्या अंगणवाडीत टाकलं आहे. या अंगणवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करुन घेतलेल्या ‘झोळी’ची कल्पना आवडल्यानं जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी आपल्या ‘शुकर’ आणि ‘सबर’ या जुळ्या मुलांना टोकर तलावच्या अंगणवाडीत प्रवेश घेतला.

शाळा आणि अंगणवाडी एकाच प्राणंगणात 

इथं ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्राणंगणात असल्यानं दोन्हीवर लक्ष तर राहीलच शिवाय जिल्ह्यातल्या इतर अंगणवाडीमध्ये देखील काय सुधारणा करता येईल याबाबत देखील जातीने लक्ष घालता येईल, या उद्देशानेचे मुले अंगणवाडीमध्ये घातल्याचे जिल्हाधिकारी सेठी यांनी स्पष्ट केलं. सामाजिक दायित्वातून त्यांनी उचललेलं हे पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असून, ते अनुकरणीयसुद्धा आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *