हैदराबाद गॅझेटबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले; विखे-बावनकुळेंच्या समितीतील महत्त्वाचा फरकही सांगितला, म्हणाले…

मराठा आरक्षणाबाबत हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे. मला याची कॉपी मिळाली आहे. समाजामध्ये सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम रहावी, हे सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावं यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे, हे घातक आहे,” असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका मांडली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली होती. त्यानंतर ओबीसी समाजासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात मंतिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. या दोन्ही उपसमित्यांमधील फरक सांगत शरद पवार यांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. “राधाकृष्ण विखेंच्या समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत. मात्र बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल, हे बघितलं पाहिजे. राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल. हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे. कटुता इतकी निर्माण झाली आहे की एकमेकांच्या व्यवसायाकडे जात नाहीत. हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हती. या देशात आरक्षणाच्या बाबतीत आदेश कोल्हापुरातून निघाला. शाहू महाराज यांनी 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं होतं, जे गरीब आहेत ते शिक्षणापासून दूर राहू नये हा हेतू शाहू महाराज यांचा होता,” असं पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *