मूल होत नसल्याच्या समस्येवर उपाय म्हणून मंत्रोच्चार आणि अंगारा लावून महिलेला पेढा देऊन एका मांत्रिकाने महिलेकडून तीन लाख १५ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
सहकारनगर परिसरात हा प्रकार घडला असून, पोलिसांनी गिरीश बलभीम सुरवसे, वय ३६ वर्ष, रा. भोसरी, याच्यावर भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. आरोपी सुरवसे याला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. हा प्रकार २८ जुलै ते नऊ सप्टेंबर २०२५ या काळात घडला आहे.
आरोपीने पीडितेला विश्वासात घेऊन मंदिरात नेले. तेथे मंत्रोच्चार करीत अघोरी विधी केल्याचे भासवले. त्यानंतर अंगाऱ्याचा पेढा खाण्यास देऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तीन लाख १५ हजारांचा ऐवज घेतला. आपली फसवणूक झाल्याच्या निदर्शनास आल्यानंतर पीडितेने तक्रार दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
‘अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणत्याही संशयास्पद व्यक्तीने जादूटोणा, अंगारे किंवा चमत्कारिक विधींच्या नावाखाली पैसे, दागिने मागितल्यास तत्काळ पोलिसांना कळवा,’ असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
दुसरीकडे, पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी एका ३८ वर्षीय व्यक्तीविरुद्ध ‘पोक्सो’ कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास आरोपीने परिसरातील अल्पवयीन मुलीला खाऊ देतो, असे आमिष दाखवून एकांतात नेले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करीत लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.