सहा वर्षांच्या नातवावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर आजीने त्याचा जोरदारपणे प्रतिकार करीत नातवाची बिबट्याच्या तावडीतून सुटका करीत त्याचा जीव वाचवल्याची घटना तालुक्यातील खडांगळी येथे रविवारी (दि. ७) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेत शिव संपत बोस (६) हा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. तर लंकाबाई पंढरीनाथ बोस (७५) या आजीने सर्वस्व पणाला लावत बिबट्याचा हल्ला परतवून लावल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
खडांगळी-पंचाळे शिव रस्त्यावर निमगाव-देवपूर शिवारात संपत बोस यांची वस्ती आहे. तेथून काही अंतरावर त्यांचा एक भाऊ वास्तव्यास आहे. या भावाकडे त्यांचा मुलगा शिव सकाळी खेळण्यासाठी गेला होता. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांची आई लंकाबाई त्याला हाताशी धरून वस्तीवर परतत असताना सरपंच कल्पना नवनाथ ठोक यांच्या वस्तीजवळ सोयाबीनच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर झडप घातली. यावेळी आजीने तातडीने प्रसंगावधान राखत सर्व शक्तिनिशी बिबट्याचा प्रतिकार करीत त्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली. त्यानंतर जोराने आरोळी ठोकत मदतीसाठी धावा केला. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बिबट्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सोयाबीनच्या शेतात धूम ठोकली.
मुलाच्या पाठीला बिबट्याची नखे लागल्यामुळे तो जखमी झाला. त्याला तातडीने प्रारंभी वडांगळी येथील खासगी दवाखान्यात आणि नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्यासह टीमने जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.
वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक गोविंद पंढरी, वाॅचमन मधुकर शिंदे, बालम शेख, रोहित लोणारे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. तिथून दीड किलोमीटर असलेल्या अंतरावर असलेल्या धनगरवाडी शिवारातही बिबट्याला पकडण्यासाठी दुसरा पिंजरा लावण्यात आला आहे.