सटाणा-ताहाराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वनोली फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघा सख्ख्या भावांसह एकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील तिघे मजुरीच्या कामासाठी निघाले असताना ही दुर्घटना घडली.
सोमवारी (दि. ८) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वसई आगाराची बस (क्र. एमएच १४, एलएक्स ८८४९) नंदुरबारहून वसईला निघाली होती. ती ताहाराबादकडून सटाण्याच्या दिशेने येत असतानाच वीरगावजवळ विनंती थांब्यानजीक समोरून वेगात आलेली दुचाकी (क्र. एमएच ४१, बीएस ४१२४) बसवर आदळली. यात दुचाकीवरील गोविंद काळू पवार (५०), विकास उर्फ विकी दयाराम माळी (१९ )आणि रोशन दयाराम माळी ( २०) यांचा जागीच मृत्यू झाला.
सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात येऊन दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बसचालक मारुती साठे (रा. वसई ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. विकास व रोशन हे दोघे सख्खे भाऊ दगावल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.