मुंबईचा वडापाव एक ऐतिहासिक पदार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. वडापावनं खऱ्या अर्थानं हे शहर घडताना पाहिलं. याच वडापावमधील पावावर मुंबईकरांनी विशेष प्रेम केलं. कोळसाभट्टीवर चालणाऱ्या बेकऱ्यांमध्ये तयार होणारे हे लादीपाव घराघरांमध्ये अनेकांच्याच न्याहारीचा भाग. बन मस्कापावपासून ते अगदी अंडपाव, पावभाजी, वडापावलपर्यंत त्यांनी मजल मारली आणि मुंबईकरांची भूक भागवली. आता मात्र याच लादीपावाला शहरातील नागरिक मुकणार हे स्पष्ट होत आहे. यास कारण ठरतोय तो म्हणजे पालिका प्रशासनाचा एक निर्णय.
बेकरीमालकांनी स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्यानं शहरातील 592 पैकी 295 बेकऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. मुंबई महापालिकेकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना पुढील कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवादरम्यान आरोग्य अधिकारी व्यस्त असल्यानं ही कारवाई लांबणीवर पडली होती. आता मात्र, गणेशोत्सवानंतर या कारवाईकडे दुर्लक्ष केलं जाणार नाहीय.
कोळशावरील बेकऱ्या आणि त्यामुळं होणारं वायूप्रदूषण हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर 2025 च्या जानेवारी महिन्यात न्यायालयाने आदेश देत 9 जुलैपर्यंत स्वच्छ इंधनाचा वापर करण्याचे आदेश दिले होते. मात्र दोनदा मुदतवाढ देऊनही पुन्हा ऑगस्ट महिन्यातील सुनावणीदरम्यान बेकरी मालकांनी यासाठी मुदतवाढ मागितली आणि न्यायालयानं यावेळी मात्र त्यांची मागणी नाकारली. न्यायालयाच्या याच कठोर भूमिकेमुळं महापालिका आता बेकऱ्यांवर कारवाई करणार आहे.