मिरा-भाईंदर महापालिकेच्या तब्बल ६५० स्थायी कर्मचाऱ्यांवर एक दिवसाच्या वेतन कपातीची कठोर कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पूर्वसूचना न देता बेजबाबदार पद्धतीने गैरहजर राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही पार पडली आहे.
गणेशोत्सवाच्या दिवसांत विसर्जन व्यवस्था उभारणे, त्याचे नियोजन करणे आणि इतर अनेक कामांमुळे प्रशासनावर मोठा ताण येतो. हे लक्षात घेऊन, गणेशोत्सव काळात कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडू नये किंवा सट्टी घेऊ नये, असा आदेश महापालिकेने परिपत्रकाद्वारे जारी केला होता. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून २९ ऑगस्ट रोजी मिरा-भाईंदर पालिका मुख्यालयासह विविध कार्यालयांतील सुमारे ६५० पेक्षा अधिक कर्मचारी कामावर गैरहजर होते.