परभणी तालुक्यातील धारणगाव येथील शेतकरी ई-पीक पाहणीसाठी शेतामध्ये निघाला. या तरुणाचं शेत दुधना नदीच्या पात्राच्या पलीकडे होतं. सध्या दुधना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि त्या पाण्यामधून तो तरुण आपल्या शेताकडे निघाला. पण अचानक तो पाण्यामध्ये बुडू लागला. त्याला वाचण्यासाठी गावातील दोन तरुणांनी उड्या देखील मारल्या, पण त्याला वाचवण्यात या दोन्ही मुलांना अपयश आलं. ई-पीक पाहणीसाठी चाललेल्या तरुणाचा पाण्यात बुडन मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी थेट या तरुणाचा मृतदेहच जिल्हाधिकारी कार्यालयात आणला.
दुधना नदीपात्रात असलेल्या पुलाची उंची कमी करावी आणि मृत तरुणाला शासकीय मदत द्यावी, तरच आम्ही मृतदेह उचलू असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला. अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी ग्रामस्थांची समजूत देखील काढली आणि यावर तात्काळ कारवाई करू असं आश्वासन देखील दिलं. पाण्यात बुडून मृत झालेल्या शेतकरी तरुणाचं नाव गजानन अश्रुबा डुकरे, वय 22 वर्ष, राहणार धारणगाव तालुका जिल्हा परभणी असं आहे.
सध्या शासनाकडून ई-पीक पाहणी ऑनलाईन केल्याशिवाय कोणत्याच शासकीय सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी वेळेमध्ये ई-पीक पाहणी ऑनलाईन करत असतात. मागील बऱ्याच दिवसांपासून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. काल पावसाने उघडीप घेतली आणि परभणीच्या धारणगाव येथील गजानन डुकरे वय 22 वर्ष तरुणाने इ-पीक पाहणी करण्यासाठी शेताकडे जाण्याचा निर्णय घेतला.
गावामधून शेताकडे जाण्यासाठी दुधना नदी ओलांडावी लागते. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने दुधना नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी होतं, त्याचबरोबर याच परिसरात दोन बंधारे बांधल्यामुळे या बंधाऱ्याचं बॅक वॉटर देखील मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे गजानन डुकरे या तरुणाने पाण्यामधून शेताकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण पाणी फार खोल असल्यामुळे त्याचा तोल गेला. तेवढ्यात गावातील दोन अल्पवयीन मुलं तेथे होती, त्यांनी या तरुणाला वाचवण्यासाठी उडी देखील घेतली. पण गजानन सापडलाच नाही.
त्यानंतर ग्रामस्थांनी ही बाब जिल्हा प्रशासनाला कळवली जिल्हा प्रशासनाने तात्काळ बोट देखील पाठवली. अथक प्रयत्न केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास गजानन डुकरे याचा मृतदेह सापडला. पण ग्रामस्थांमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड रोष निर्माण झाली. मागील बऱ्याच वर्षापासून धारणगाव येथील ग्रामस्थ दुधना नदीवर करण्यात आलेल्या पुलाची उंची कमी करावी अशी मागणी करत आहेत, पुलाची उंची जास्त असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे आणि त्यामुळे नदीपलीकडील शेताकडे जाण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागता. यासाठी ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर देखील बहिष्कार टाकला होता आणि त्यावेळी जिल्हा प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढू असं आश्वासन देखील दिलं होतं.
जिल्हा प्रशासन केवळ आश्वासन देत आहे आणि गावातमध्ये या पाण्यामुळे मृत्यू होत आहेत हे ग्रामस्थांना सहन झालं नाही. आज सकाळीच ग्रामस्थ या तरुणाचा मृतदेह घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह आणल्यानंतर मात्र सर्वच जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं. पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्याचबरोबर अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे हे देखील आले. ग्रामस्थांना याप्रकरणी तात्काळ तोडगा काढू असं आश्वासन दिलं.
पण लेखी आश्वासन दिल्याशिवाय आणि मृत तरुणाला शासकीय मदत जाहीर केल्याशिवाय आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून हलणार नाही, असाच पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला. वर्षानुवर्ष एखादी मागणी ग्रामस्थ लावून धरत आहेत आणि त्याला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद जिल्हा प्रशासनाकडून मिळत नसल्याचं या घटनेवरून मात्र समोर आलं आहे.