मुंबईत शॉर्टसर्किटमुळे २३ मजली इमारतीला भीषण आग; गुदमरुन 80 वर्षीय महिलेचा मृत्यू, 19 जण जखमी

दहिसर पूर्वेकडील एस.व्ही. रोड शांतीनगरमधील न्यू जनकल्याण सोसायटी या २३ मजली इमारतीत रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाने अडकलेल्या ३६ जणांची सुटका केली.

१९ जण जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यामध्ये धुरामुळे अनेक जण गुदमरले. त्यापैकी एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दहिसर पूर्वेला शांतीनगरमध्ये २३ मजली न्यू जनकल्याण सोसायटी आहे. रविवारी दुपारी या इमारतीच्या तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत आग लागली. या इमारतीच्या तळघरात असलेल्या दोन मीटर केबिनला आग लागल्यानंतर ही आग पसरत गेली. इलेक्ट्रिक वायर, केबल आदींमुळे आग पसरताना ती इलेक्ट्रिक डक्टमधूनही पसरली. इमारतीत झालेल्या प्रचंड धुरामुळे अनेकांना श्वास कोंडला. घाबरलेल्या काही रहिवाशांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. तर काहींनी सुरक्षित ठिकाण म्हणून इमारतीच्या गच्चीवर जाणे पसंत केले. परिसरातील अनेकांनी आग लागलेल्या इमारतीतील रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेकांकडून मदतीसाठी हाकही देण्यात येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *