हेड मसाज चालू असताना तरुणीच्या… सलूनवाल्याकडून विनयभंग, पुण्यातील धक्कादायक घटना

 पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सलूनमध्ये आलेल्या तरूणीचा विनयभंग करण्यात आलाय. पुण्यात कायम गजबलेला असणाऱ्या सिंहगड रोड परिसरामध्ये ही घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे महिला आणि तरूणी सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा बाहेर राज्यातील असून त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

शहरात अल्पवयीन मुलीचा सलूनमध्ये हेअर स्पाच्या नावाखाली विनयभंग झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. ही घटना तीन सप्टेंबरला दुपारी साडेअकराच्या सुमारास नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. उमर युनूस सलमानी (वय १९, रा. वडगाव बु. मूळ गाव बिजनौर, उत्तर प्रदेश) याच्यावर भारतीय न्याय संहिता, तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार यांची चौदा वर्षीय मुलगी केसांच्या स्पासाठी सलूनमध्ये गेली होती. स्पामध्ये मुलीचा हेड मसाज चालू असताना आरोपीने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. या घटनेमुळे मुलगी घाबरली व तिने लगेच पालकांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *