तालुक्यातील कनाशी आदिवासी आश्रम शाळेतील तब्बल ५१ विद्यार्थिनी अचानक अस्वस्थ झाल्याने खळबळ उडाली. उलट्या, ताप, जुलाब व अंगशिथिलपणा अशी लक्षणे दिसून आल्याने अन्नातून विषबाधा किंवा दूषित पाण्यामुळे असा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सर्व विद्यार्थिनींवर कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यापैकी पाच विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतर विद्यार्थिनींना उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याने आश्रशाळेत पाठविण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कळवण प्रकल्पातील आश्रम शाळांना दररोजचे जेवण बागलाण तालुक्यातील दहिदुले येथील ‘सेंट्रल किचन’मधून पुरवले जाते. या किचनमधूनच दळवट आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना दोन दिवसांपूर्वी असाच त्रास झाला होता. त्यानंतर कनाशी येथील आश्रम शाळेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींना त्रास झाल्याने अन्न पुरवठ्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय नागरिक व पालकांनी व्यक्त केला. येथील पुरवठा तातडीने बंद करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन पवार यांनी तत्काळ कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात विद्यार्थिनींची विचारपूस केली. आवश्यक औषधे व उपचार तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. त्यानंतर त्यांनी प्रकल्प अधिकारी अनुकुरी नरेश यांच्याशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले.
