मुंबईत सध्या अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. याचबरोबर राज्यातही पावासाचा जोर काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहर तसेच उपनगरात शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबईत मागील आठवड्यात पावसाचा जोर होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. आता पुन्हा एकदा मुंबईत पाऊस जोर धरणार आहे. ओडिशाकडील कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकणार असल्याने याचाच परिणाम म्हणून आजपासून पाऊस हळूहळू वाढण्यास सुरुवात होईल. आजपासून प्रामुख्याने शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवार सायंकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रविवारनंतर पावसाचा जोर ओसरेल.
