विधान भवनातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर ठगांनी आरटीओचं चलान अशा नावाने पाठवलेल्या फाइलवर क्लिक केल्याने या व्यक्तीला 3 लाख रुपये गमवावे लागलेत. नेमकं या व्यक्तीसोबत घडलं काय पाहूयात…
व्हॉट्सअप ग्रुपवर आलेला तो मेसेज
बोगस आरटीओ चलन या एपीके फाइलवर क्लिक केल्याने या व्यक्तीच्या खात्यातील 3 लाख रुपये लंपास झाले. याप्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेला सुरक्षा अधिकारी मुंबई पोलिस दलात कार्यरत असून, ताडदेव पोलिस लाइनमध्ये वास्तव्यास आहे. 18 ऑगस्टच्या दुपारी साडेबारा वाजता बॅच क्रमांक 1988 या व्हॉट्सअप ग्रुपवर ‘आरटीओ चलन’ ही एपीके फाइल आली. त्यामध्ये महत्त्वाची माहिती असेल, या विचाराने पोलिसाने त्या लिंकवर क्लिक केले. लगेच त्यांच्या मोबाइलवर एक अॅप डाऊनलोड झाले. त्यावर एक फॉर्म ओपन झाला. फॉर्मवर वैयक्तिक माहिती भरण्याबाबत सूचना दिली होती.
अन् शंका आली पण तोपर्यंत उशीर झालेला
पोलिसाने नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता भरून फॉर्म सबमीट केला असता, त्याच्याकडे बँक डिटेल्स मागितली गेली. संशय आल्याने बागवान यांनी बँक खात्याची माहिती न भरता ते लिंकमधून एक्झिट झाले. तसेच, त्यांनी अॅप अनइस्टॉल केले. तोपर्यंत उशीर झाला होता. सायबर ठगांनी तक्रारदार पोलिसांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवत 3 लाख रुपयांवर डल्ला मारला. फसवणूक झाल्याची खात्री पटताच पीडित व्यक्तीने 1930 हेल्पलाइनवर तक्रार दिली. त्यानंतर ताडदेव पोलिस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली.
FAQ
