मुंबईतील सर्वात मानाच्या आणि प्रतिष्ठित अशा लालबागचा राजाचे भाविकांना बुधवारपासून दर्शन घेता येणार आहे. लालबागचा राजाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांना लाडक्या बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. रविवारी लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली होती. लालबागच्या राजाचा समोरचा मखमखली पडदा दूर झाल्यानंतर गणपतीचे दर्शन झाले. हा मखमखली पडदा मुस्लीम कारागिरांनी शिवला आहे. लालबाग राजाच्या मूर्तीच्या 50 फुटी उंच मंडपासमोरील मखमली पडदा घडवण्याचे काम उत्तर प्रदेशमधील मुस्लिम कारागिरांनी केले आहे.
50 फूट उंच आणि रुंद पडदा तयार करताना त्याचा निऱ्या बसवलेला घेरही तब्बल आठ फुटाचा आहे. चार दिवस या पडद्यावर खान चाचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिलाई मशीनवर घाम गाळत केले आहे. लालबागचा राजा समोरील भव्य पडदा हा हा हिंदू-मुस्लीम सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा आणि श्रद्धेला धर्म नसतो, हा संदेश देणारा आहे. लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्णराज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
लालबागचा राजा हा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण राहिला आहे. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटी येत असतात. लालबागचा राजाचे मुखदर्शन आणि नवसाची रांगही चर्चेचा विषय असतो.
Mumbai Ganesh Utsav: मुंबईत गणेशोत्सवासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 20 हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. गणेशोत्सव काळात संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी भाविकांच्या गर्दीत साध्या गणवेशातील पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. मुंबईत लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, अंधेरी, चिंचपोकळी, विलेपार्ले, डोंगरी, उमरखाडीसह विविध ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यासाठी पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी मिरवणूकदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांचा वॉच असणार आहे. गोवंडी, देवनार, मालाड, मालवणी या भागांमध्येही अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात येईल.
पोलिसांची एकूण संख्या – 20 हजार
पोलिस उपआयुक्त – 36
सहायक आयुक्त – 51
अधिकारी – 2637
अंमलदार – 14430
