: बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण वातावरण गणेशभक्तीमध्ये न्हावून निघतं. घरोघरी बाप्पाचे आगमन आणि छोट्या मोठ्या मंडळात बाप्पा विराजमान होतात. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान गणेश भक्त एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनला जातात. त्यासोबत मोठ्या संख्येने लोकं गणेश मंडळातील बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. अशात मुंबईत वाहूतक कोंडी आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई वाहतूक विभागाने वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. अनेक रस्ते गाड्यांसाठी बंद, काही रस्त्यांमध्ये बदल तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित केले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात ट्रॅफिकमध्ये अख्खा दिवस जाऊ नये म्हणून मुंबईतील वाहतूक बदल जाणून घ्या. मुंबईत 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात अपेक्षित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
‘या’ मार्गात बदल!
गणेशोत्सव काळात दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनांना छत्रपती संभाजी राजे कोस्टल रोडने जाणे बंधनकारक असेल.
ईस्टर्न फ्रीवे (विलासराव देशमुख फ्रीवे) आणि अटल सेतू वापरणाऱ्या वाहनांना सीएसएमटी, भाटिया बाग, मेट्रो जंक्शन आणि प्रिन्सेस स्ट्रीट मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
अनंत चतुर्दशी (6 सप्टेंबर 2025) रोजी, मिरवणूक आणि विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी कुलाबा, मरीन ड्राइव्ह, काळबादेवी, गिरगाव, दादर, शिवाजी पार्क, लालबाग, परळ, भायखळा आणि बोरिवली येथील अनेक प्रमुख रस्ते बंद किंवा वळवले जातील.
पार्किंग आणि वाहन निर्बंध!
विसर्जनाच्या दिवशी कुलाबा, मरीन ड्राइव्ह, दादर, माहीम, चेंबूर, जुहू, मालाड, कांदिवली आणि बोरिवली येथील प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ झोन लागू केले जातील.
दक्षिण मुंबईत सकाळी 7 ते मध्यरात्रीपर्यंत जड वाहने आणि खाजगी बसेसना प्रवेश बंदी असेल तर उपनगरांमध्ये सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे.
मुख्य विसर्जनाच्या दिवशी, हे निर्बंध 24 तास लागू असणार आहे.
मात्र अत्यावश्यक सेवांसाठी अपवाद
रुग्णवाहिका, दूध व्हॅन, बेकरी पुरवठा करणारी वाहने, पाण्याचे टँकर, पेट्रोलियम टँकर आणि स्कूल बसेस यासारख्या आपत्कालीन सेवांना हे निर्बंध लागू होणार नाहीत, ज्यांना चालविण्यास परवानगी असेल.
उड्डाणपुलांवर विशेष सुरक्षा उपाययोजना
जुन्या आणि धोकादायक रेल्वे उड्डाणपुलांवर बीएमसीने कडक सुरक्षा नियम लागू केले आहेत. पुलावर एका वेळी 100 पेक्षा जास्त लोकांना परवानगी राहणार नाही. पुलांवर थांबणे, नाचणे किंवा डीजे/लाऊडस्पीकर वापरणे सक्त मनाई असणार आहे. विसर्जनाच्या दिवशी गिरगाव, लालबाग, दादर-शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, मालाड-मार्वे आणि बोरिवली जेट्टी परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अत्यंत आवश्यक नसल्यास हे मार्ग टाळावेत आणि त्याऐवजी कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे आणि उड्डाणपुलांचा वापर करून त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचावे. गणेश चतुर्थी सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्व भाविकांना आणि रहिवाशांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.
