पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे याने भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याची उमेदवारी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. उमेशने नवी दिल्लीतील राज्यसभेच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारीसाठी आवश्यक असलेले १५ हजार रुपयांचे डिपॉझिटही त्याने जमा केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेश यांनी अर्ज दाखल केला आहे.
पुण्याच्या उमेश म्हेत्रे यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल केल्याने महाराष्ट्रातील अजून एक उमेदवार या संवैधानिक पदासाठी निवडणूक लढवत आहे. भारतीय संविधानानुसार, उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराला किमान ३५ वर्षे वय आणि २० प्रस्तावक तसेच २० अनुमोदकांचा पाठिंबा आवश्यक आहे. उमेशने या सर्व अटींची पूर्तता केली असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या निर्णयाचे दौंड तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे. उमेशच्या उमेदवारीमुळे सहजपूर गाव आणि दौंड तालुका राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहेत. आता निवडणूक आयोगाकडून उमेशच्या अर्जाची छाननी होईल, आणि त्याची उमेदवारी वैध ठरल्यास तो निवडणुकीत काय प्रभाव पाडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.