महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई आणि परिसरात मराठी-हिंदी भाषिक संघर्षाच्या काही घटना समोर आल्यानंतर याचं लोण आता नाशिकमध्ये पोहोचलं आहे. नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय व्यक्तीला चोप दिल्याची घटना समोर आली आहे. सदर व्यक्तीने एका मराठी कुटुंबाला दादागिरी करत मारहाण केल्याचा आरोप आहे. जय भवानी रोड, नाशिक येथे ही घटना घडली. गाडीला धक्का लागल्याचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला त्याने अरेरावी केली. त्यामुळे मनसैनिकांनी त्याला चोप देऊन माफी मागायला लावली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नाशिकरोडच्या जयभवानी रोडवर एक लासुरे नावाचे मराठी कुटुंब राहते. नुकतीच एका परप्रांतीय व्यक्तीने त्यांच्याशी दादागिरी केली. सदर व्यक्तीने त्यांना शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. तो माणूस चारचाकी गाडी चालवायला शिकत होता. त्यावेळी त्याने लासुरे यांच्या प्लेजर या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीला नुकसान झाल्याने लासुरे कुटुंबीयांनी त्याला जाब विचारला.
जाब विचारल्यावर तो माणूस चिडला आणि त्याने लासुरे कुटुंबाला अपशब्द वापरले. “तुम मराठी लोग तुम्हारे औकात मे रहो, तुम्हारी गाडी भंगार है, और तुम्हारा घर भी भंगार है,” असं मराठी कुटुंबाला उद्देशून तो म्हणाला.