कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीत मीटर रिक्षा चालवण्याच्या प्रवाशाच्या मागणीची अखेर रिक्षा संघटनेसह वाहतूक विभाग आणि आरटीओ प्रशासनाने दखल घेतली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्टपासून कल्याणमध्ये मीटर रिक्षा चालवल्या जाणार असल्याची माहिती रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी दिली. शुक्रवारी पेणकर यांनी वाहतूक पोलिस, आरटीओ, रेल्वे अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मीटर रिक्षासाठी स्टँड निश्चित करण्यात आला असून उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षा स्टँडवरूनच मीटर रिक्षा चालवल्या जाणार आहेत.
कल्याण – डोंबिवली शहरांत अस्ताव्यस्त पसरलेल्या लाखो रिक्षाच्या गराड्यातून एकीकडे प्रवाशांना मार्ग काढणे जिकरीचे होत असताना रिक्षा चालकाकडून मीटर रिक्षापेक्षा शेअर रिक्षा आणि थेट रिक्षा असा पर्याय देत प्रवाशांना वेठीस धरले जाते. उच्च न्यायालयाने शहरात मीटर रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतरही रिक्षाचालक शहरात मीटर रिक्षा मिळणारच नाहीत, यासारखी उर्मट उत्तरे प्रवाशांना देतात. यामुळे शहरात मीटर रिक्षा कधी धावणार असा प्रश्न प्रवाशांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. अखेर आरटीओ आणि रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यानी पुन्हा एकदा मीटर रिक्षाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी पुढाकार घेत आरटीओ, शहर पोलिस, वाहतूक पोलिस, रेल्वे अधिकारी यांच्या समवेत मीटर रिक्षा स्टँडची जागा निश्चित केली. दरम्यान यापूर्वीही मीटर रिक्षा आणि प्रीपेड रिक्षा सेवा देखील सुरु करण्यात आली होती मात्र प्रवाशाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद करावी लागल्याचे रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असून आता शहरात मीटर सेवा सुरळीत दिली जावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.