पुणे पोलीस दलातील खळबळजनक बातमी, गांजा तस्करांना संरक्षण, पोलीस अंमलदार निलंबित

गांजा तस्करांशी थेट संगनमत करून अवैध धंद्यांना पोलीस संरक्षण दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणात स्वारगेट पोलीस ठाण्यातील अंमलदार नवनाथ शिंदे यांना पोलीस दलातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले. परिमंडळ दोनचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी हा आदेश देताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना काही दिवसांपूर्वी सहकारनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी आणि अन्य अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली. या आधारे गुन्हे शाखा युनिट पाचचे निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान प्रतिक पवार या युवकाला अटक करून त्याच्याकडून 5 किलो 260 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

मोठे जाळे उघड

प्रतिक पवारची चौकशी केली असता, हा माल त्याला सौरभ कट्टीमणी ऊर्फ पाटील, सागर चव्हाण ऊर्फ डोंगाभाई आणि मॅनेजर अभिजित सावंत यांच्या मार्फत मिळत असल्याचे निष्पन्न झाले. पवार आणि त्याचा साथीदार सॅण्डी ऊर्फ संदीप घोटे या दोघांकडे गांज्याचा पुरवठा केला जात होता. या सर्वांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाईल तपासात शिंदेचं नाव

तपासदरम्यान प्रतिक पवारच्या मोबाइलमध्ये एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती आला. त्यात पोलीस अंमलदार शिंदे यांचा क्रमांक ‘एन बी’ या नावाने सेव्ह असल्याचे उघड झाले. त्याबाबत पवारला विचारणा केली असता, शिंदे हे सहकारनगर हद्दीत वसुलीचे काम पाहतात, तसेच स्पा, पिटा, मटका क्लब यांसारख्या अवैध धंद्यांना थेट पाठबळ देतात, अशी माहिती समोर आली.

पोलीस दलात खळबळ

या धक्कादायक उघडकीनंतर शिंदे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, अवैध धंद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कुठलीही गय केली जाणार नाही. याच आदेशाच्या अनुषंगाने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

एसीपी कार्यालयात आणखी एक ‘ऑपरेटर’

शिंदे यांची काही महिन्यांपूर्वी सहकारनगरहून स्वारगेट पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, स्वारगेट येथे हजर असूनही आठ महिने त्यांनी एसीपी कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम केले. नुकतेच त्यांना स्वारगेट ठाण्यात जमा करण्यात आले होते. दरम्यान, अन्य एका पोलीस ठाण्यात नेमणूक असलेला अंमलदार एसीपी कार्यालयात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. पोलीस आयुक्त या प्रकाराकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *