पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमधील हा धक्कादायक प्रकार आहे. बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर अशी या दोघांची नावं आहेत. या घटनेनंतर कोमकर कुटुंबात शोककळा पसरली आहे. बापू कोमकर यांच्या शस्त्रकियानंतर लगेचच मृत्यू झाला तर पत्नी कामिनी यांनी शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी श्वास सोडला.
दरम्यान रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दोघा नवरा बायकोचा मृत्यू झाल्याचा आरोप कोमकरांच्या कुटुंबियांनी केलाय. याप्रकरणी संबंधीत डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बापू कोमकर यांना गंभीर आजार होता. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गंभीर आजारापणामुळे बापू कोमकर यांना लिव्हरची गरज होती. म्हणून त्यांचा लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेतला. अशात पतीचा जीव वाचविण्यासाठी पत्नीने पुढाकार घेतला. पत्नी कामिनी कोमकर यांनी पतीला लिव्हर दान करण्याचा मोठा निर्णय घेतला.
गेल्या बुधवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली पण जीवदान मिळण्याऐवजी दोघांचाही जीव गेल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.