लेकाने आयुष्य संपवलं, माऊलीला दु:ख सहन होईना; दुसऱ्यादिवशी आईनेही प्राण सोडले, नांदेड हळहळलं

ऐन पोळा सणाच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात मन हेलावून लावणारी घटना घडली आहे. येथे अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गुरुवारी (21 ऑगस्ट) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलाच्या निधनाचा मानसिक धक्का बसलेल्या आईने देखील घटनेच्या 24 तासाच्या आत प्राण सोडले आहे. या घटनेमुळे एका पाठोपाठ एक दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईक आणि गावकऱ्यांवर आली. दरम्यान, या घटनेने फुलवळ गावावर एकच शोककळा पसरली आहे.

कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सूर्यकांत लक्ष्मणराव मंगनाळे हे अल्पभूधारक शेतकरी होते. सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने सूर्यकांत हे नेहमी चिंतेत राहायचे. काही दिवसांपूर्वी फुलवळ मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचे सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतीशिवाय अन्य उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. याच चिंतेतून 46 वर्षीय सूर्यकांत मंगनाळे यांनी गुरुवारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घराचा कर्ताधर्ता मुलगा गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती. अंत्यविधीला नातेवाईक-गावकरी मोठ्या प्रमाणात जमले होते. गुरुवारी सायंकळी चार वाजेच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत या शेतकऱ्यावर अंत्यविधी पार पडला.

अंत्यविधीला आलेले काही पाहुणे आपआपल्या गावी परतले, तर काही पाहुणे थांबले होते. कुटुंबात शोकाचे वातावरण होते. दुसरीकडे, मुलाच्या आत्महत्येने आई देऊबाई मंगनाळे (वय 70) यांनी धास्ती घेतली. शुक्रवारी (22ऑगस्ट) सकाळी आठ वाजता त्यांचे निधन झाले. देऊबाई यांच्यावर दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास फुलवळ येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात्य कुटुंबात पती, एक मुलगा, एक मुलगी, दोन सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. ऐन पोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं असून गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या दुःखद दोन घटनेने गावकऱ्यांनी पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *