दारुच्या नशेत मित्रांनीच मित्राला निर्घृणपणे संपवलं; हॉटेलचं बिल देण्यावरुन झालेला वाद, तिघांना अटक

हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून चार जणांनी मित्राचा खून केला. ही घटना मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेल येथे घडली. गणेश लक्ष्मण पोखरकर (वय ३४, रा. विठ्ठलवाडी, देहू गाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार संतोष बांबळे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विनोद विश्वनाथ मोरे (वय ४५, रा. विठ्ठलवाडी, देहू गाव), गोरख विष्णू कुटे (वय ४५, दत्तवाडी, आकुर्डी), संतोष आनंद मराठे (वय ३९, आकुर्डी) आणि चंद्रकांत दत्ता बुट्टे (वय ३९, आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विनोद, गोरख आणि संतोष या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पोखरकर आणि आरोपी मित्र आहेत. ते तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. हॉटेलचे बिल देण्यावरून त्यांच्यात वाद झाला.

रागाच्या भरात आरोपी विनोद मोरे याने हॉटेलमधील लाकडी दांडक्याने गणेश पोखरकर याच्या पाठीवर, पोटावर आणि छातीवर मारहाण करून त्याला जखमी केले. त्यानंतर गणेश पुन्हा आरोपीवर धावून गेल्यावर, इतर आरोपींनी संगनमत करून त्याला लाकडी दांडक्यांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून ठार मारले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *