मनाला चटका लावून जाणारी घटना! मुसळधार पावसातून वाचले; पण वाटेत अनर्थ, मुंबईत मायलेकाचा जागीच मृत्यू

मुसळधार पाऊस पडत असल्याने मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेलेल्या मातेचा आणि मुलाचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडाळा परिसरात घडली. भरधाव बसने धडक दिल्याने इलोजियस सेल्वराज (२७) आणि तिचा मुलगा अँटोनी (७) या दोघांचा मृत्यू झाला. यावेळी आणखी दोन मुले तिच्यासोबत होती. सुदैवाने या अपघातमधून ती बचावली. याप्रकरणी पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला अटक केली आहे.

मुंबईत पावसाचा जोर वाढत असल्याने दुपारनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. वडाळा येथे वास्तव्यास असलेली इलोजियस ही मुलांना आणण्यासाठी परिसरातच असलेल्या सेंट जोसेफ शाळेत पोहोचली. तीन मुलांना घेऊन परतत असताना दुपारी ३च्या सुमारास १७४ क्रमांकाच्या बेस्ट बसने तिला धडक दिली. भरधाव बस येत असल्याचे पाहून तिने दोन मुलांना बाजूला सारले, मात्र ती आणि अँटोनी दोघे बसखाली चिरडले.

गंभीर जखमी झालेल्या इलोजियस हिला सायन रुग्णालयात, तर अँटोनी याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसचालक बाबू नागपेन्ने (४०) याला अटक केली. निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाबू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *