‘पोलिसांनी आम्हाल घरात घुसून मारलं’; पुण्यातील त्या तीन तरूणींवरच गुन्हा दाखल, नेमकं काय कारण?

कोथरूड पोलिस ठाण्यात तीन मुलींना मारहाण व जातिवाचक शिवीगाळ झाल्याच्या आरोपावरून पोलिस आयुक्तालयात आंदोलन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित तीन मुलींसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी उपनिरीक्षक रेश्मा भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून, सागर आल्हाट, स्वप्नील वाघमारे, दत्ता शेंडगे, अॅड. परिक्रमा खोत, श्वेता पाटील, नितीन पाटील, ऋषीकेश भोलाने आणि अॅड. रेखा चौरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १९०, १८९ (२), २२१, २२३, ३२४ (३); तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१), ३७(३) अंतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील ‘मिसिंग’ प्रकरणात तीन मुलींना तपासासाठी कोथरूड पोलिस ठाण्यात आणले होते. त्या वेळी त्यांना मारहाण व शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला, या आरोपावरून त्या मुली व त्यांचे सहकारी आक्रमक झाले होते. त्यांनी तीन ऑगस्टला सकाळी १० पासून मध्यरात्री तीनपर्यंत पोलिस आयुक्तालयात आंदोलन केले. ५० ते ६० जणांनी ‘अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा’ अशी मागणी धरून ठेवली. मात्र, या प्रकरणातील तपासात कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. घटनास्थळ इनडोअर असल्याचे नमूद करीत पोलिसांनी संबंधितांना पत्र दिले; तसेच दोन मुलींच्या वैद्यकीय अहवालात कोणत्याही ताज्या जखमा किंवा मारहाणीचे व्रण आढळले नाहीत. तरीदेखील श्वेता पाटील हिने पोलिसांसमोर हे पत्र फाडून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आता पोलिसांनी केलेल्या तक्रारीनुसार, आंदोलनादरम्यान आरोपीनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळले नाहीत, सरकारी कामात अडथळा आणला, प्रक्षोभक घोषणा देऊन सार्वजनिक शांतता भंग केली आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले. आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अंजली आंबेडकर व सुजात आंबेडकर यांनीदेखील रात्रभर उपस्थित राहून मुलींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *