मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना आज, मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. खासगी कार्यालयं, आस्थापना यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज म्हणजेच वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना द्याव्यात, असं प्रशासनाने सांगितलं आहे.
भारतीय हवामान खात्याने आज, 19 ऑगस्ट रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र – मुंबई शहर आणि उपनगरे अतिमुसळधार पावसाचा इशारा अर्थात रेड अलर्ट दिला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत सातत्याने पाऊस पडत आहे.
या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महापालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरुपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पावसाने दडी मारली होती. मात्र, सोमवारी शहरात पावसाने दमदार पुनरागमन केले. काही काळ संततधार सुरू होती. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर सायंकाळपर्यंत होता. त्यानंतर काहीशी उघडीप मिळाली. पुढील दोन दिवसांतही पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहेत. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरात दिवसभर पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात घट झाली. सोमवारी 24.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 21.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहर आणि परिसरात मंगळवारी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट क्षेत्रात काही ठिकाणी खूप जोरदार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.