गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये खुनाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणामुळे तरुणांचे जीव जात असून अशीच एक धक्कादायक घटना आज पहाटे तीन वाजता घडली आहे. एक 26 वर्षीय तरुण रात्रभर लाईट नसल्याने वीज वितरण कार्यालयामध्ये जात असताना सहा ते सात जणांच्या टोळक्याकडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जळगाव शहर पुन्हा हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची असं हत्या झालेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सहा ते सात जणांनी सोमवारी पहाटे तीक्ष्ण हत्यारांनी वार करत विशालचा जीव घेतला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला? हे अद्याप समोर आलं नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची पहाटे जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील एमएसईबी कार्यालयाजवळ निर्घृण हत्या करण्यात आली. परिसरातील लाईट गेल्यामुळे विशाल पहाटे 3 वाजेच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसमवेत वीज वितरण कार्यालयात तक्रार देण्यासाठी जात होता. त्याचवेळी एमएसईबी कार्यालयाच्या जवळच 6 ते 7 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून त्याला ठार केले.