कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, पंचगंगा पात्राबाहेर, अनेक गावांचा संपर्क तुटला, रेड अर्लट जारी

कोल्हापूर जिल्हा मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडला असून जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संततधार पावसामुळे कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी तब्बल पाचव्यांदा पात्राबाहेर गेली आहे. तर राधानगरीसह इतर प्रमुख धरणांमधून सुरु असलेल्या प्रचंड विसर्गामुळे नदीपातळीत आणखी वाढ होणार आहे.

पंचगंगेची पाणीपातळीत झपाट्याने वाढ..
राजाराम बंधाऱ्याजवळ सोमवारी दुपारी 3 वाजता पंचगंगेची पाणीपातळी 30 फूट 09 इंच म्हणजेच 539.23 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. नदीची इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, धरणांमधून सतत वाढणाऱ्या विसर्गामुळे ही पाणीपातळी झपाट्याने वर जाण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले..
सोमवारी पहाटेपर्यंत राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडल्याने एकूण सात दरवाजांतून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. याशिवाय BOT पॉवरहाऊसमधून 1,500 क्युसेक पाणी विसर्ग करण्यात येत असून धरणातून एकूण 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळे आधीच पात्राबाहेर गेलेल्या पंचगंगेची पातळी आणखी वेगाने वाढत आहे.

अन्य धरणांतूनही मोठा विसर्ग
सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील इतर धरणांचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे. कोल्हापुरातील वारणा धरणातून 6,630 क्युसेक, कुंभी धरणातून 1,300 क्युसेक, दूधगंगा धरणातून 5,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *