उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका भारतीय लष्कर जवानाला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भारतीय जवानाला खांबाला बांधून बांबूने मारण्यात आलं. टोलनाक्यावर झालेल्या वादानंतर चौघांनी मिळून भारतीय लष्कर जवानाला मारहाण केली. तेथून जाणाऱ्या एका प्रवाशाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद केला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी चार टोल कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
कपिल कावड असं भारतीय जवानाचं नाव आहे. भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटमध्ये कपिल कावड तैनात आहेत. कपिल कावड श्रीनगरला सीमेवर तैनात होण्यासाठी निघाले होते. सुटु्टीसाठी ते दिल्लीतील आपल्या घरी आले होते. श्रीनगरला जाण्यासाठी दिल्ली विमानतळाकडे निघालेले असताना त्यांना मारहाण झाली.
कपिल कावड आणि त्यांचा चुलत भाऊ गाडीने विमानतळाकडे निघाले असताना भुनी टोलनाक्यावर अडकले. वाहतूक कोंडीत अडकून विमानासाठी उशीर होईल अशी चिंता त्यांना सतावत होती. यामुळे कपिल गाडीतून खाली उतरले आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी बोलू लागले.
यादरम्यान कपिल कावड आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर पाच टोल कर्मचाऱ्यांनी मिळून कपिल यांना मारहाण केली. कपिल यांच्या चुलत भावालाही मारहाण कऱण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कर्मचारी बांबूने कपिल यांना मारहाण करताना दिसत आहे. यानंतर काहींनी कपिल यांना खांबाला बांधलं आणि त्यांचे हात मागे बांधून शिव्या घातल्या. यादरम्यान त्यांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली.
पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितलं आहे की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “कपिल भारतीय सैन्यात आहेत. तो त्याच्या पोस्टवर परतत होता. भुनी टोल बूथवर लांब रांग होती. तो घाईत होता आणि त्यांनी टोल बूथ कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यानंतर वाद सुरू झाला आणि टोल बूथ कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. त्याच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर, सरूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे”.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओच्या आधारे चार जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना अटक करण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत.
काही वृत्तांनुसार, कपिलने टोल बूथ कर्मचाऱ्यांना त्याचे गाव टोल शुल्कातून मुक्त असलेल्या क्षेत्रात असल्याचे सांगितले तेव्हा हा वाद सुरू झाला. यामुळे वादविवाद झाला आणि त्याचे पर्यावसान सैनिकाच्या हल्ल्यात झाले.
काही रिपोर्टनुसार, कपिलने टोल बूथ कर्मचाऱ्यांना त्याचे गाव टोलमधून मुक्त असलेल्या क्षेत्रात असल्याचे सांगितले तेव्हा हा वाद सुरू झाला. यामुळे वादविवाद झाला आणि त्याचे रुपांतर हल्ल्यात झाले.