शिरुर तालुक्यातील कवठे येमाई (अष्टविनायक महामार्ग) परिसरात रविवार 17 ऑगस्ट रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर (ता. पारनेर) येथील वाजे कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला. मृतांमध्ये 38 वर्षीय ज्ञानेश्वर मकाजी वाजे, 68 वर्षीय शांताबाई मकाजी वाजे आणि त्यांचा 5 वर्षीय मुलगा युवांश यांचा समावेश आहे.
ज्ञानेश्वर वाजे हे आई व लहान मुलासह मुंबईहून दूध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून आपल्या गावी जात होते. पहाटे सुमारास काळूबाई नगर येथील बंटी ढाब्याजवळ दुध टँकर (एमएच 16 सीडी 9819) हा मालवाहू ट्रकला (एमएच 42 बी 8866) जोरदार धडकला. धडक इतकी भीषण होती की टँकर थेट ट्रकमध्ये घुसला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र, लहानगा युवांश घटनास्थळीच ठार झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शांताबाई आणि ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे वडनेर गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अष्टविनायक महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे हा मार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची स्थानिकांची भावना असून, धोकादायक वळणांवर चेतावणी फलक व शास्त्रीय गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ट्रक-रिक्षा अपघातात तीन जणांचा मृत्यू
मालवाहू ट्रकने ॲपे रिक्षाला जोराने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जालना-राजूर रोडवरील राजूर चौफुली परिसरात हा अपघात झाला.
भरत निवृत्ती खोसे, गणेश तुकाराम बोरसे आणि सुनीता नारायण वैद्य हे तिघे ॲपे रिक्षाने जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते. या वेळी राजूर रोडवर सूर्या लॉन्सजवळ त्यांचा ॲपे रिक्षाला मालवाहू ट्रकने धडक दिली. या धडकेत ॲपे रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मालवाहू ट्रकचालक पसार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली; तसेच ट्रकचालकाला पाठलाग करून ताब्यात घेतले. मांडवा येथील अनेक नागरिकांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.