स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत गेलेली सोलापुरातील इयत्ता आठवीतील मुलीचे अपहरण झाले होते. सोलापूर शहर पोलीस दलातील फौजदार चावडी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरुणाला कराड येथून ताब्यात घेतलं. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर सोलापूर पोलिसांनी 24 तासांत मुलीसह तरुणाला शोधून काढलं. सिद्राम बुक्का, वय 19 वर्षे, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर, असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
स्वातंत्र्य दिनाला शाळेत गेली; परत आलीच नव्हती
आठवीत शिक्षण घेणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे रहायला होते. त्यावेळी संशयित आरोपी सिद्राम बुक्काची अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय त्याला कंटाळून हत्तूर येथे राहायला गेले होते.
15 ऑगस्ट रोजी शाळेतील स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी ती विद्यार्थिनी सकाळी साडेसहा वाजता घरातून बाहेर पडली होती. 11.30 वाजल्यानंतरही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इतरत्र शोध घेतला, मैत्रिणींकडे विचारपूस केली, परंतु मुलगी सापडली नाही.
पोलीस ठाण्यात दाखल होताच तपासाची चक्रे फिरवली
अल्पवयीन मुलीच्या आईने ताबडतोब फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. पोलिसांनी शाळा ते सोलापूर एसटी स्टॅण्ड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी पाठलाग केला आणि मोहोळ बस स्टॅण्डवर चौकशी केली असता दुचाकी लावून कराडला गेल्याचे चौकशीत समोर आले.
सिद्रामच्या भावजीचा क्रमांक घेतला अन् कराडला ताब्यात
संशयित आरोपी सिद्राम बुक्काची बहीण कराड येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. कराडला जाताना वाटेतच पोलिसांनी सिद्रामच्या भावजीचा क्रमांक मिळविला. त्यानंतर सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्या क्रमांकाचे लोकेशन शोधले आणि पोलिस त्याठिकाणी पोचले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी कराड येथील घरी दिसली. पण, सिद्राम बाहेर गेला होता.
पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि सिद्राम यायची वाट पाहिली. तत्पूर्वी, घरातील सर्वांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतले होते. काही वेळाने सिद्राम बहिणीच्या घरी आला आणि पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन सोलापूरची वाट धरली. सिद्रामविरुद्ध अपहरणासह ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.