मुंबई पोलिसांत कार्यरत असेलेले उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कृष्ण आत्माराम जोशी असं या निधन झालेल्या उपनिरीक्षकाचं नाव असल्याची माहिती आहे. रविवारी (17 ऑगस्ट) सकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे. देवनार पोलिस ठाण्यात तैनात असलेले जोशी यांची नवी मुंबईतील त्यांच्या घरी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे पोलिस विभागात शोककळा पसरली आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिस अधिकाऱ्याला राहच्या घरी हृदयविकाराच्या झटका, रुग्णालयात मृत्यू
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 52 वर्षीय कृष्ण आत्माराम जोशी हे नवी मुंबईतील त्यांच्या घरी होते. अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तात्काळ कळंबोली परिसरातील एमजीएम रुग्णालयात नेले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अनेक वर्षांपासून मुंबई पोलिसात कार्यरत होते जोशी, पोलिस विभागात शोककळा
जोशी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलिसांच्या सेवेत होते आणि सध्या ते देवनार पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या प्रामाणिकपणा, समर्पण आणि साध्या स्वभावामुळे ते त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र शोक पसरले आहे.