पत्नीची हत्या केल्या प्रकरणी भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये भाजप नेता रोहित सैनी याने पत्नी संजू हिचा खून केल्याचा आरोप आहे. रोहितने गर्लफ्रेंड रितू सैनी हिच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याची माहिती आहे. 10 ऑगस्टला खून केल्यानंतर रोहितने दरोड्याचा बनाव रचला होता. मात्र दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलिसांनी 24 तासांच्या आत उधळून लावला. या प्रकरणाचा छडा लावत भाजप नेता रोहित आणि त्याची गर्लफ्रेंड रितू सैनी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
रोहिती सैनी याची पत्नी संजू 10 ऑगस्ट रोजी राहत्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळली होती. अज्ञात चोरट्यांनी हत्या करुन घरातील मौल्यवान वस्तू लुटून नेल्याचा दावा रोहित सैनीने सुरुवातीला केला होता. मात्र, तपासादरम्यान त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्यामुळे पोलिसांना संशय आला. कसून चौकशी केल्यानंतर रोहितने खुनाची कबुली दिली आणि संपूर्ण कट उघड केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितूसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून रोहितने पत्नीची हत्या केली. संजू मार्गातील अडथळा ठरत असल्यामुळे रितूने रोहितला तिला मार्गातून हटवण्यास सांगितल्याचा आरोप आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर रोहितने या घटनेला लुटमारीचा रंग देऊन गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला होता.
रोहित आणि रितू दोघांनाही राजस्थानच्या अजमेरमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील चौकशी सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.