कोकणात मागील काही दिवसांपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आता रत्नागिरी व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा असलेला आंबा घाटा इथं दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. येथील दरड हटवण्याचे काम संगमेश्वर तालुका प्रशासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खनजवळ आज सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूने पाच यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. थोड्या वेळात एका बाजूची मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
कोकणात मागील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कटाई करण्यात आलेल्या डोंगरामुळे राहिलेल्या डोंगराचा भाग सतत कोसळत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक धास्तावले आहेत. त्यातच वाहतूक कोंडी होत आहे. सततच्या पावसामुळे दरड बाजूला हटवण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमेश्वर तालुका तहसीदार अमृता साबळे व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत. या सगळ्या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे. लवकरच दरड बाजूला केल्यानंतर दोन्ही मार्गिका सुरू केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, संगमेश्वर येथील देवरुख स्टॅण्डसमोरील नदीच्या जवळील संरक्षण भिंत कोसळून तीन अनधिकृत दुकानाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मटण मार्केटजवळ पाणी आलं असून दापोली खेड राज्य मार्ग वाहतुकीसाठी अद्याप बंद आहे.