महाराष्ट्रात पावसानं जोर धरलेला असतानाच मुंबईसुद्धा इथं अपवाद ठरली नसून, शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं शहराच्या अनेक सखल भागांमध्ये शनिवारी पहाटेपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. मुंबई शहर, उपनगरांसह नवी मुंबईतही पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्याचा थेट परिणाम रस्ते वाहतुकीपासून रेल्वे वाहतुकीवरही झाला. शनिवारी पहाटे 5 वाजल्यापासून मुंबईच्या समुद्राला उधाण आल्यानं समुद्राला 3.59 मीटरची भरती आली आणि या भरती दरम्यान पाऊस झाल्यांन मुंबई जलमय झाली.
मुंबई एका रात्रीत जलमय…
मुंबईत मुसळधार पावसाने पाणी साचयला सुरुवात झाली आणि शुक्रवारी रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी साचलं. ज्यामुळं चुनाभट्टी, सोमैय्या मैदान परिसरात पाणी साचल्याने पूर्व द्रुतगती माहामार्ग वरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळालं. तर, किंग्ज सर्कल, गांधी नगर भागात पाणी साचल्याने मुंबईहुन ठाणे, नाशिककडे जाणारी वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान सकाळी 8 नंतर शहरात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीसुद्धा साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत असल्यानं त्याचा थेट परिणाम रस्ते वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई शहरापासून ते अगदी कल्याण, डोंबिवली, ठाणे मुंबई उपनगर परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांचा गोंधळ उडाला. पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, मध्य रेलवेची वाहतूक शनिवारी सकाळी 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू असल्याचं स्पष्ट झालं. दादर, कुर्ला सायन दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे वाहतूक विस्कळीत झाली ज्यामुळं रेल्वे प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागला. पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरही हे चित्र पाहायला मिळालं. दरम्यान पाऊस थांबतच हे साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरीसुद्धा रेल्वे प्रवास काहीसा धीम्या गतीनं होत आहे हीच वस्तुस्थिती.
शहरात तीन तासात विक्रमी पाऊस
एकिकडे शहरात दहिहंडीसाठी अनेक बाळगोपाळांची पथकं सज्ज असतानाच शहरात वाढलेला पावसाचा जोर पाहता यंत्रणांनीसुद्धा नारिकांना या परिस्थितीत स्वत:सोबत इतरांचीही काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं. दरम्यान 16 ऑगस्टपासून मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत (3 तास) सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.
(पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)
पश्चिम उपनगरं –
मरोळ अग्निशमन केंद्र – 207
नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ – 202
चकाला महानगरपालिका शाळा, अंधेरी – 195
मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा, अंधेरी – 183
अंधेरी अग्निशमन केंद्र- 177
पूर्व उपनगरं-
टागोर नगर महानगरपालिका शाळा, विक्रोळी – 196