दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही’, असं म्हणत काका अजित पवार यांनी पुतण्या रोहित पवारला थेट प्रत्युत्तर दिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना रोहित पवारांना टोलाल लगावला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील पवार काका-पुतण्यांचे आरोप-प्रत्यारोप राज्यभरात चर्चेत आले होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि इतर काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांसाठी सांगलीकडे जाण्यापूर्वी कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवर देखील अजित पवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका केली होती.