नागपूर येथून उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे नागपूर येथील पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) बनविण्यात आली असून, राज्यभरातील सर्व प्रकरणे तपासासाठी याच एसआयटीकडे पाठविण्याचे आदेश पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. या तपासाचा नियमित अहवाल सादर करण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा राज्यभर असल्याने तपासही वाढणार आहे. त्यामुळे यासाठी आणखी मनुष्यबळ तसेच पोलिस अधिकाऱ्यांची गरज पडल्यास आवश्यकतेनुसार समावेश करून घेण्याचा अधिकार एसआयटी प्रमुखांना देण्यात आला आहे. बराच मोठा घोटाळा आणि त्याची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याने तपासाचा अहवाल नियमित सादर करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या वतीने विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश सोमवारी जारी केले. बोगस शिक्षक दाखवून त्यांच्या पगाराच्या नावाने शासनाकडून निधी लाटला जात होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वप्रथम नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहून या घोटाळ्याच्या तपासाकरिता उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली. तपासादरम्यान राज्यभर अशा प्रकारचा घोटाळा झाला असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणे झा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे पाठविण्यात येणार आहेत.