जिम ट्रेनर तरुणीने बुधवारी भरदुपारी आपल्या मित्राच्या मदतीने एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. जिम ट्रेनर प्रांजल तावरे आणि यश पाटोळे या दोघांनी मिळून लल्ला उर्फ गोपीनाथ वरपे याचा खून केल्याचा आरोप आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत. कायदा मोडणाऱ्यांना कोणाचाच धाक शिल्लक नसल्याचे चित्र सध्या या दोन शहरात पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय बुधवारी पुन्हा आला.
प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांचे चऱ्होली भागात प्रोटीन पझल शॉपही आहे. प्रांजल आणि यश हे गोपीनाथ वरपे याला आधीपासूनच ओळखत होते. जिथे प्रांजल आणि यश जिम ट्रेनर आहेत, तिथेच जिमसाठी गोपीनाथ वरपे सुद्धा यायचा आणि या ठिकाणीच या तिघांचीही ओळख झाली होती.
माहितीनुसार, यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांनी लल्ला उर्फ गोपीनाथ वर्पे याची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली. प्रांजलला गोपीनाथ शिवीगाळ करायचा, पैशांची मागणी करत असल्यानं ती त्रासाला कंटाळली होती. यातूनच ही घटना घडल्याचा आरोप आहे.
प्रांजल आणि यश यांचं पार्टनरशिपमध्ये प्रोटीन पझल शॉप आहे. या शॉपमध्ये बुधवारी दुपारी गोपीनाथ आला होता. त्यावेळी पुन्हा एकदा प्रांजलला त्रास दिला, शिवीगाळ करत अश्लील बोलत असल्याने त्यांच्यात वाद झाला. यावेळी प्रांजलने गोपीनाथला कानशिलात मारली. तेव्हा तिने यशच्या मदतीने गोपीनाथला पहार आणि लोखंडी रॉड मारहाण केली. डोक्यात रॉड घातल्यानं गंभीर जखमी झालेल्या गोपीनाथला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
