कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्वातंत्र्यदिनी चिकन मटन विक्रीवर घातलेली बंदी कायम असून नागरिकांच्या खाण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. या दिवशी मटन चिकन विक्री करताना आढळल्यास त्यांचा माल परवाना विभागाच्या नियमानुसार जप्त केला जाणार असल्याचं सांगत पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं नमूद केलं आहे. महापालिकेला अधिनियमानुसार मिळालेल्या अधिकारात १९८८साली घेण्यात आलेल्या निर्णयाची आपण अंमलबजावणी केली असून राजकीय पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत चर्चा केली जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
निर्णय देशभरात गाजला
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत १९८८ सालच्या तत्कालीन प्रशासकानी गणेशोत्सव, १५ऑगस्ट यासह पाच ते सहा दिवस शहरात कत्तलखाने आणि चिकन मटन विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. तेव्हापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू असताना अचानक राजकीय पक्षाकडून या विषयाला हवा देण्यात आली. ज्यामुळे पालिकेचा हा निर्णय देशभरात चांगलाच गाजला. अनेक राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयाच्या आवारात चिकन मटन खाण्यासह कोंबड्या सोडणार असल्याचं सांगत आंदोलन केली आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी निर्णय मागे घेण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणला आहे. मात्र याचवेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महापालिकांनी केल्यानंतर आयुक्तांना हुरूप चढला असून आयुक्तांनी आपण सध्या निर्णयावर ठाम असल्याचं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
